वेदांतानंतर आता मुंबईतलं PhonePe चे कार्यालय कर्नाटकात होणार स्थलांतरित

मुंबई: वेदांता प्रकल्पानंतर आता मुंबईतील PhonePe चे कार्यालय कर्नाटकात स्थलांतरित होणार असल्याच्या निर्णयाची माहिती कंपनीने वृत्तपत्रात जाहिरातीद्वारे दिली आहे. वेदांता प्रकल्पानंतर राज्यात राजकीय वाद सुरु झाला होता. यावरुन महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. आता पुन्हा एकदा PhonePe चे कार्यालय कर्नाटकात गेल्याने हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

फोन पे ने मुंबईतलं कार्यालय बंगळुरुला नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारसाठी धक्का मानला जातो आहे. फोन पे कार्यालय का बाहेर नेणार आहे? हे कारण समजू शकलेलं नाही. मात्र आता यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालं आहे. डिजिटल पेमेंटमध्ये फोनपे ही कंपनी अग्रस्थानी आहे. त्यांनी त्यांचं मुंबईतलं कार्यालय कर्नाटकमध्ये नेण्याचा निर्णय़ घेतला आहे. एका वृत्तपत्रात ही माहिती छापून आली आहे. जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार या दोघांनीही ही माहिती ट्विट करत शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

रोहित पवारांचं ट्विट?

वेदांतानंतर #PhonePe ची बारी गब्बर होतायेत शेजारी महाराष्ट्र पडतोय आजारी व्वा रे सत्ताधारी!!! टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक #PAY महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा #WAY! हे ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट?

आजच्या वर्तमानपत्रातील ही नोटीस आहे..वेदांत/फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मध्ये गेला आणि त्यापाठोपाठ फोन पे चे मुख्य ऑफिस देखील कर्नाटकात जाण्याच्या वाटेवर..काय चाललंय काय ? महाराष्ट्रातली बेरोजगारी संपली कि काय ? जाहिरातीत आक्षेप असल्यास नोंदवा असे जाहीर केले आहे आक्षेप नोंदवा …. असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.