मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव राज्याचा कारभार सांभाळतात; फोटो शेअर करत राष्ट्रवादीचा आरोप
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून त्यावरून मुख्यमंत्री शिंदेंवर विरोधकांनी टीका केली आहे. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचं दिसणारा फोटो शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा असं म्हणत राष्ट्रवादीने खोचक टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही रविकांत वरपे यांनी केला.
खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.
मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर?@mieknathshinde @DrSEShinde pic.twitter.com/rpOZimHnxL— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) September 23, 2022
मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधताना राष्ट्रवादी काँग्रसने प्रश्नही उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत त्यांचा चिरंजीव बसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रविकांत वरपे यांनी प्रश्न विचारताना म्हटलं की, आता हा कोणता राजधर्म? असा कसा हा धर्मवीर? तसेच राष्ट्रवादीच्या नेत्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसल्याचं दिसत आहे. तसंच त्यांच्या खुर्चीच्या मागे महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री असा बोर्डही दिसतो.