किवी फळाचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत, जाणून घ्या!
आपल्या देशात फळ खाणं हे नेहमीच आरोग्याच्या दृष्टीने चांगलं समजण्यात येतं. कारण फळांमध्ये असे अनेक गुण असतात, जे आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतात. या फळांमध्येही अशी काही खास फळं आहेत, जी तुमचं आरोग्य तर चांगलं राखतातच. पण त्याचबरोबर तुमची त्वचा सुंदर करण्यातही महत्त्वाची भूमिका साकारतात. अशी फळं खाल्ल्याने तुमची त्वचा अधिक तजेलदार आणि चमकदार होते. त्याच फळांपैकी एक फळ आहे ते म्हणजे किवी.
बाहेरून दिसायला हे फळ जरी आकर्षक दिसत नसलं तरीही या किवी फळ खाण्याचे फायदे अनेक आहेत. अनेक जणांना या फळाबाबत माहिती नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला या बामती मधून किवीबद्दल इत्यंभूत माहिती देणार आहोत. कारण हे फळ त्वचेसाठी वरदान असून नक्की याचा उपयोग आपल्यासाठी कसा करून घ्यायचा हे आपण जाणून घेऊया.
जाणून घ्या किवी फळ खाण्याचे फायदे
थोडंसं भुऱ्या रंगाची परत असणारं अंडाकार आकाराचं हे किवी फळ म्हणजे अँटिऑक्सिडंट्ससाठी पॉवरहाऊस आहे. काही दिवस तुम्ही रोज जर हे एक फळ खाल्लंत तर तुमच्या आरोग्यासाठी हे लाभदायक आहे. किवीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील आजार दूर होतात.
किवीवर केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, किवीमध्ये संत्र आणि लिंबू या दोन्ही फळांपेक्षा अधिक प्रमाणात विटामिन सी असतं. त्यामुळे हेल्थ एक्स्पर्टदेखील डाएट फॉलो करताना रोज त्यामध्ये किवीचा समावेश करण्याचा सल्ला देतात. तुम्हाला माहीत आहे का? साधारण 100 ग्रॅम किवीमध्ये 154 टक्के इतक्या प्रमाणात विटामिन सी असतं. जे विटामिन सी चा स्रोत समजण्यात येणाऱ्या संत्र आणि लिंबू या दोन्ही फळांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
याचबरोबर तुम्ही निरोगी राहण्यासाठी सर्वात गरजेचं असणारं विटामिन ए देखील किवी या फळामध्ये अंतर्भूत असतं. ही दोन्ही विटामिन्स अप्रतिम अँटिऑक्सिडंट्स असून आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उत्तम उपाय आहे. किवीमध्ये विटामिन सी असल्यामुळे आपली इम्यून सिस्टिम अर्थात प्रतिकारशक्ती क्षमता अधिक चांगली होण्यास मदत होते. तसंच शरीरामध्ये होणाऱ्या इन्फेक्शनपासून वाचण्यासदेखील याची आपल्याला मदत होते.