डासांमुळे कोण कोणते रोग होतात? जाणून घ्या!
जेथे माणूस तेथे डास, हे अगदी खरे आहे. डास हे माणसाच्या विकासाचेच एक फळ आहे. भारतात अनेक प्रकारचे डास आढळतात. यात मुख्यतः अॅनोफिलस, क्युलेक्स, एडिस व मान्सोनिया इत्यादी प्रकारांचा समावेश होतो.
आपल्याला नुसत्या डोळ्यांनी सगळे डास सारखे दिसले, तरी प्रत्यक्षात त्यांच्यात खूप फरक असतो. डासांचे जीवनचक्र, विश्रांतीच्या व पोषणाच्या सवयी, भिंतीवर बसण्याची पद्धत, पैदास होण्यासाठी आवश्यक असलेले पर्यावरण, शारीरिक वैशिष्टय़े, इत्यादींवरून वेगवेगळ्या डासांची ओळख पटवता येते.
डासांमुळे हिवताप, हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर, पीतज्वर, डेंग्यू इत्यादी रोगांचे संक्रमण होते. यांपैकी हिवताप व हत्तीरोग हे भारतातील महत्त्वाचे आरोग्यविषयक प्रश्न आहेत. अॅनोफिलस डासांच्या मादीमुळे हिवताप, तर क्युलेक्समुळे हत्तीरोग हे आजार रुग्णापासून निरोगी माणसांपर्यंत संक्रमित होतात.
डासांचा नायनाट करण्यासाठी अनेक उपाय अवलंबावे लागतील. महत्त्वाचे म्हणजे घरात व घराभोवती पाण्याची डबकी जमा होऊ न देणे. त्यात भर घालून ती बुजवावी, कारण त्यात डासांची पैदास होते. हे शक्य नसल्यास डबक्यांमध्ये रॉकेल व इंजिन ऑईल टाकावे. डी.डी.टी.च्या नियमित फवारणीमुळे (वर्षांतून दोनदा) प्रौढ डासांवर नियंत्रण मिळवता येते.
एवढे करूनही डासांची समस्या न सुटल्यास स्वतःचे डासांच्या चाव्यांपासुन संरक्षण तरी करावे. यासाठी डासांना पळवून लावणारे मलम, तेल व अगरबत्ती इत्यादींचा वापर करता येतो. पण सगळ्यात उत्तम म्हणजे मच्छरदाणी.