मेट्रोचे काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक

19
पुणे  : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे शहरातील गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वळवण्यास विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक भूमिका दर्शवली असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, उड्डाणपूल उभारणीचं काम पूर्ण होईपर्यंत विद्यापीठाच्या आतून विद्यापीठाचे मुख्य गेट ते वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेपर्यंत नवा रस्ता तयार करण्यासंदर्भातील‌ प्रस्ताव समोर आला होता. या प्रस्तावाला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणानेही (पुम्टा) मान्यता दिली होती. आता विद्यापीठ प्रशासनाने अनुकूलता दर्शवल्यामुळे पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही पाटील यांनी म्हटले.
या बैठकीला पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे, पुणे विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता विजय ढवळे, विद्यापीठ विकास मंच समन्वयक राजेश पांडे, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.