बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू; बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ

4

मुंबई : बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचा बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर येथे आज शुभारंभ झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसह पर्यटकांच्या सुविधा मार्गी लागणार असल्याचे बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

भुसे यांनी नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बोटीतून बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत प्रवास केला. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

यावेळी आमदार मंदा म्हात्रे, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सैनी, नयनतारा कंपनीचे रोहित सिन्हा यांच्यासह विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

भुसे म्हणाले की, या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून प्रवासी सुरक्षित प्रवास करू शकतील. ही सुविधा कमीत कमी दरात असून वेळेचीही बचत होणार आहे. पूर्वी बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया या प्रवासासाठी दीड तास लागत होता. तो आता कमी होऊन 55 मिनिटांपर्यंत आला आहे. या उपक्रमासाठी बंदरे विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने मान्यता दिली आहे. तसेच केंद्र सरकारने केलेली मदतही महत्त्वाची ठरली आहे. पुढील कालावधीत गेटवे ऑफ इंडिया जवळील रेडिओ क्लबजवळ नवीन जेट्टी निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवासी बोटीसाठी सुविधा निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागाच्या पाठिशी असून अशा प्रकल्पांच्या माध्यमातून रस्त्यावरच्या  वाहतूक समस्येतून मुक्तता मिळणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. भविष्यात प्रवाशांना आणखी व्यवस्था उभारण्याकरिता ठाणे जवळील ‘रॉक क्रिक’ चा काही भाग तोडल्यास पालघर, वसई, ठाणे, बेलापूर अशी प्रवासी जल वाहतूक उपलब्ध होईल. अशा वेगवेगळ्या योजनांना विभागाच्या वतीने गती देण्यात येत आहे, मंत्री भुसे यांनी सांगितले.

थोडक्यात वॉटर टॅक्सी विषयी

बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया हे रस्तामार्गे अंतर ४० कि.मी असून त्या करिता अंदाजे १ तास ४५ मिनिटे इतका अवधी लागतो. परंतु बेलापूर ते गेटवे हे जलमार्ग अंतर २४ कि.मी असून त्याकरिता फक्त एक तासाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

जेट्टीचे काम हे केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत करण्यात आले असून या कामासाठी 8.37 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत 50:50 या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच वाहनतळ व इतर सुविधांसाठी ठाणे जिल्हा नियोजन समितीकडून 4.35 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला होता. या ठिकाणी 75 चार चाकी आणि 85 दुचाकी वाहनाकरिता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मेसर्स नयनतारा शिपिंग प्रा. लि यांचेकडून नयन XI या बोटीद्वारे ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु आहे. देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार दरम्यान बेलापूर – गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावर धावणार आहे. सकाळी ८.३० वाजता बेलापूर-गेटवे ऑफ इंडिया आणि संध्याकाळी ६.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया -बेलापूर अशा दोन फेऱ्या होणार आहेत. जलवाहतुकीचा प्रवास सर्वसामान्य लोकांकरिता सुलभ, सोईचे व लवकर होण्यासाठी या कंपनीमार्फत सद्यस्थितीत सामान्य बैठकीसाठी रु २५०/- व बिझनेस क्लास करिता रु. ३५०/- इतके तिकीट दर आकारण्यात येणार आहे. या वॉटर टॅक्सीचे ऑनलाईन बुकीग My Boat Ride या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

1 जानेवारी 2022 पासून नव्याने सुरु झालेल्या जलमार्गावरील फेरी आणि रो-रो बोटीद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच पाळीव प्राणी, वाहन, माल इत्यादीवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून आकारल्या जाणाऱ्या प्रवासी करात पुढील 3 वर्षासाठी म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत सूट देण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.