कोल्हापूरप्रमाणे पुण्यात उत्तम दर्जाची चित्रनगरी निर्माण करण्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे मागणी
पुणे : आज २१व्या आंतरराष्ट्रीय पुणे फिल्म फेस्टिव्हलच्या समारोप कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विजेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशातील अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपल्या कलाकृती सादर केल्या.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. सगळ्या प्रकारच्या कलेचे अविष्कार येथे होतात. मुंबई ही हिंदी चित्रपटाची जन्मभूमी, कर्मभूमी मानली जाते त्याचप्रमाणे पुण्याला मराठी चित्रपटाची जन्मभूमी मानली जाते. त्यामुळे कोल्हापूरप्रमाणे पुण्यात उत्तम दर्जाचा चित्रनगरी निर्माण करण्याची सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे मागणी केली आहे. या चित्रनगरीच्या माध्यमातून पुण्यात अनेक चांगले चित्रपट निर्माण होतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मभुषण जानु बर्मा, अभिनेत्री पद्मश्री विद्या बालन, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.
डॉ. पटेल म्हणाले, २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुमारे १ लाख नागरिकांनी चित्रपट बघितले. चित्रपट दाखविण्याबरोबर जागतिक पातळीवरील विविध विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.