कसबा विधानसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळवायचेय, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे : येत्या २६ फेब्रुवारीला कसबा आणि चिंचवड येथील विधानसभा पोटनिवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपकडून तर प्रचाराचा धुमधडाका सुरु आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील मागील अनेक दिवसांपासून या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. भाजपाला विजयी करण्याचा जणू त्यांनी निश्चयच केला आहे.भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

संपूर्ण महाराष्ट्रात आठ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना सरकारवर सर्वसामान्य माणसाचा विश्वास आहे, प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळवायचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पाटील पुढे म्हणाले, आम्ही सर्वजण ताकतीने या निवडणुकीत उतरलो आहोत कारण प्रत्येक गोष्ट नीट व ताकतीने करायची ही भाजपची कार्यपद्धती आहे. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण प्रचार कार्यात सहभागी झालो आहोत. पाटील पुढे म्हणाले, ही जागा सोपी आहे. भाजपची परंपरागत आहे. ती प्रतिष्ठेची आहे. कारण परंपरागत जागा नुसती जिंकून उपयोगाची नाही, तर मोठ्या मताधिक्याने जिंकायची आहे.