राज्यात ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ सुरु करणार – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार,जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ राज्यात सुरु करण्यात येणार आहे. तसेच, नाशिक येथील भगूर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी स्वा.सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा व कार्यक्रमात सावरकरप्रेमी नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

भगूरमधील ‘सावरकर वाडा’ येथे पर्यटन विभागामार्फत आयोजित मुख्य कार्यक्रमात पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था-संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.  ‘स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी भव्य अभिवादन पदयात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १०:३० दरम्यान सावरकर वाडा येथील मुख्य कार्यक्रमात गायक चारुदत्त दीक्षित व सहकलाकारांचे स्वा. सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित अभिवाचन, मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत.

वीर सावरकर पर्यटन सर्किट

देशातील पहिल्या ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’मध्ये सावकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक, रत्नागिरी, पुणे आणि सांगली येथील ठिकाणे आहेत. यामध्ये सावरकरांचे जन्मस्थान भगूर वाडा आणि अष्टभुजा देवी मंदिर, नाशिक येथील अभिनव भारत मंदिर, तीळभांडेश्वर गल्ली, डेक्कन येथील सावरकर अध्यासन केंद्र, पहिली विदेशी कपड्यांची होळी, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिर, शिरगाव रत्नागिरी येथे सावरकर काही काळ वास्तव्यास होते ती खोली तसेच डॉ. हेडगेवार आणि सावरकर यांची पहिली भेट झाली ते ठिकाण, गुरव समाजाचे मारूती मंदिर,  रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिर, सावरकारांनी सुरू केलेली कन्या शाळा,  दादर येथील सावरकर सदन आणि सावरकर स्मारक,सांगली येथील बाबाराव सावरकर स्मारक या ठिकाणांचा समावेश आहे.

थीम पार्क

भगूर येथे निर्माणधीन ‘थीम पार्क’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून स्वा. सावरकरांच्या विचार-दर्शनावर आधारित भव्य थीम पार्क व संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे.  राष्ट्रासाठी असीम त्याग व समर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना, त्यांच्या विचार व कार्याला या भव्य पदयात्रा व कार्यक्रमाच्या निमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे. त्यामुळे भगूर, नाशिक शहर, जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून अधिकाधिक सावरकरभक्त नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग तसेच अन्य सहयोगी संस्था-संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!