लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे, कसबा निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई  : कसबा आणि चिंचवड येथील निवडणूक जाहीर होताच भाजप आणि महाविकस आघाडी यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. या निवडणुकीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.  या दोन्ही मतदारसंघाचा निकाल अखेर हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. तर चिंचवड मध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयी झाल्या आहेत. कसब्यात भाजपचा पराभव झाल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे , अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटले कि, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील‌ जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू!

 

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. दुसरीकडे चिंचवडमध्ये राष्ट्रवादी मध्ये बंडखोरी झाल्यामुळे हि तिरंगी लढत पाहायला मिळाली. अश्विनी जगताप यांचा ३५ हजारांहून जास्त मतांनी मोठा विजय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा फटका बसला असताना चिंचवडमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले आहे.