इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही – राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

8

मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाहीयामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दु. २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात फिर्याद क्र. ००३७ अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थीशिक्षकपालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावीअसे श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.