राष्ट्रीय महामार्ग व भूसंपादन विभाग यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार वाढीव मोबदला मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

कोल्हापूर : कोल्हापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी कोल्हापूर प्राधिकरणातील ४२ गावांपैकी ७ गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या सात गावातील शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील भूसंपादनाप्रमाणे चार पट मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग व भूसंपादन विभाग यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार वाढीव मोबदला मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करावा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात प्राधिकरणातील शिये, भुये, निगवे दुमाला, भुयेवाडी, टोप, नागाव व जठारवाडी या गावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना वाढीव मोबदला मिळण्याबाबतच्या निवेदनावर चर्चा केली. प्रशासनाने कोल्हापूर प्राधिकरणातील सात गावांमधील ज्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी राष्ट्रीय महामार्गात जाणार आहेत त्यांना इतर ग्रामीण भागात ज्याप्रमाणे मोबदला मिळतो त्याप्रमाणे मोबदला मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करावा व तो शासनाला सादर करावा असेही सांगितले . भूसंपादनाच्या वाढीव मोबदला मिळण्यापासून प्राधिकरणातील या सात गावांमधील एकही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, असेही चंद्रकांत पाटील यांनी सुचित केले.
याप्रसंगी आमदार पी. एन. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, भूसंपादन अधिकारी शक्ती कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.