पुण्यात मासिक पाळीचे रक्त विकण्याचा अघोरी प्रकार… गुन्हेगारांविरोधात जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलमं लावण्याचे चंद्रकांत पाटील यांचे पोलिसांना निर्देश

पुणे : पुण्यात एक अघोरी प्रकार समोर आला आहे. सासरच्या लोकांनी एका महिलेला मासिक पाळीच्या वेळी हातपाय बांधून अतिशय विचित्र प्रकार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या गुन्हेगारांविरोधात जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलम लावण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

आज विधिमंडळाबाहेर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कि, पुणे जिल्ह्यात घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. एकीकडे विज्ञानयुग सुरु असताना दुसरीकडे अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. असा विचित्र प्रकार करणाऱ्यांना कायद्याची भीती वाटली पाहिजे, इतकी कडक कलमं त्यांच्यावर लावली पाहिजेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, पुणे जिल्ह्यामध्ये सासरच्या लोकांनी एका महिलेला मासिक पाळीच्या वेळी हातपाय बांधून एक अत्यंत विचित्र प्रकार केला आहे जो इतक्या जाहीरपणे बोलावासाही वाटत नाही. समाजात एका बाजूला विज्ञान युग सुरु असतानां भयंकर अंधश्रद्धा वाढत चालली आहे. ज्या अंधश्रद्धे मध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात . या घटनेची माहिती मिळताच ताबडतोब मी पुणे महानगर पालिकेत घडली का ? म्हणून पुणे आयुक्तांशी बोललो. त्यावेळी हि घटना पुणे ग्रामीण मधील असल्याचे लक्षात आले. पुणे ग्रामीण पोलिसांशी तातडीने बोलून मी असे सांगितले कि, मला प्रथम रिपोर्ट हवा आहे कि नेमकं काय घडलंय. त्या घडलेल्या घटनेप्रमाणे जेवढी कडक कलम लावता येतील तेवढी लावा. कारण अशा प्रकारच्या घटनांमध्ये जी भीती कायद्याने वाटत नाही ती कायद्याची भीती वाटली पाहिजे. माझा असा दावा आहे कि पुणे जिल्ह्याचे एसपी हे इतके कर्तव्यदक्ष आहेत त्यामुळे आज दिवभरामध्ये खूप गोष्टी घडतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

नेमके प्रकरण काय ?

तक्रारदार २७ वर्षीय महिला विश्रांतवाडी भागात राहणारी , विवाहानंतर बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. पतीसह नातेवाईकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. मासिक पाळी दरम्यान आरोपींनी या महिलेसोबत अघोरी कृत्य केले. जादूटोण्यासाठी मासिक पाळीचे रक्त विकल्याचा अघोरी प्रकार करण्यात आला आहे. या छळामुळे ती माहेरी निघून आली.

या प्रकरणी आरोपींच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य, विनयभंग , शारीरिक मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.