जुन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

पुणे : जुन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे भूमिपूजन आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. जीएसटी प्रमाणेच महसूल विभाग हा राज्याला उत्पन्न मिळवून देणारा विभाग असल्याने महसूल विभागाची कार्यालये सूसज्ज आणि अद्ययावत असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाला जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. त्याप्रमाणे महसूल विभागाच्या माध्यमातून राज्याला उत्पन्न मिळते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महसूल विभागाची कार्यालये अद्ययावत आणि सर्व सोईसुविधांनी सुसज्ज असावीत यावर भर दिला होता. त्यानुसार राज्यातील अनेक कार्यालये अद्ययावत करण्यात आली. जुन्नर तालुक्यातील उपनिबंधक कार्यालयदेखील अद्ययावत करण्यात येत आहे. लवकरात लवकर ही इमारत उभी राहून, त्याचे लोकार्पण व्हावे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, महसूल विभागात येणारा प्रत्येक व्यक्ती हा करदाता असतो. त्यामुळे त्याचा सेवक म्हणून कर्मचाऱ्यांनी काम करावे. त्याला चांगली वागणूक देण्यासोबतच जनतेची कामे वेगाने करावीत , असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
यावेळी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड, दीपक सोनावणे, अधिक्षक अभियंता बी. एन. बहिर, उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील , पुणे ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक दीपक पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके आदी उपस्थित होते.