पर्यावरण रक्षण, वृक्ष वाचविणे आणि संवर्धन यासाठी जगभरात प्रयत्न सुरू – चंद्रकांत पाटील

पुणे :  राज्यातील वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना देण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’च्या २०१८ व २०१९ या वर्षीच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचा वितरण सोहळा यशदा येथे वनमंत्री सुधीर  मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.   पर्यावरण रक्षण, वृक्ष वाचविणे आणि संवर्धन यासाठी जगभरात प्रयत्न सुरू असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि , उच्च व तंत्र शिक्षण विभागाने युनिसेफ समवेत सामंजस्य करार केलेला आहे. त्यानुसार राज्यातील ३३ लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या अनुषंगाने जलसंधारण, पर्यावरण रक्षण आदी कार्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत एक व्हर्चुअल प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यात या विषयाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षण, वृक्ष वाचविणे आणि संवर्धन यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. सयाजी शिंदेंसारख्या अभिनेत्याने वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. वनश्री पुरस्कार मिळवलेल्यांनी देखील या प्रयत्नांना पुढे नेण्याचे काम केले आहे.
पाटील पुढे म्हणाले कि, सामाजिक जाण असणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी एका भेटीदरम्यान मंदिरांमध्ये  प्रसादासोबत छोटेसे रोप देण्याची सुंदर कल्पना मांडली. या उपक्रमासाठी त्यांची सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेऊन देण्यात पुढाकार घेतला असल्याचे पाटील म्हणाले .  आता लवकरच ही कल्पना सत्य झालेली दिसेल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत पुरस्कारांचेही संयुक्त व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार १ लाख रुपये, द्वितीय ७५ हजार रुपये, तृतीय पुरस्कार ५० हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी प्रधान सचिव (वने) बी. वेणूगोपाल रेड्डी, सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक  डॉ. सुनिता सिंग, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वन अकादमी चंद्रपूरचे संचालक श्रीनिवास रेड्डी आदी उपस्थित होते.