शास्त्रीय नृत्यकला आणि लोककलेला प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आयोजित आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था प्रस्तुत ‘नृत्यवंदना’ हा अनोखा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला. तब्बल ७५० कलाकारांनी २४ समूहात सादर केलेल्या कलाकृती डोळ्यात साठवाव्या अशाच होत्या. चंद्रकातदादांनी राबवलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय म्हणावा लागेल. शास्त्रीय नृत्यकला आणि लोककलेला प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे संगीत आणि नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलेचा हा ठेवा जपण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु, तसेच कोथरुडमध्ये नृत्यसंकुल उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. हिंदू संस्कृतीत शास्त्रीय नृत्य कला आणि लोककलेच्या साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण यातूनच अनेकांना मानसिक समाधान मिळते. आपल्या संस्कृतीचे महत्त्व ओळखूनच आगामी काळात अनेक परदेशी नागरिक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे कलेला प्रोत्साहन देणे हे आपलं कर्तव्य असल्याचे पाटील म्हणाले.

