पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विभागस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यास आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती दर्शविली आणि मार्गदर्शन केले. सामाजिक क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला. यावेळी पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार करावा, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल, अशी ग्वाही देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, स्वयंसेवी संस्था आपले वैयक्तिक योगदान देऊन शासनाच्या योजना राबवतात. हे काम स्वतःच्या समाधानासाठी, आत्म्याची भूक भागविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने करण्यात येते. इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी हे कार्य केले जाते. या कार्यात विविधता वाढवावी आणि समाजाच्या गरजा लक्षात ठेवून उपक्रम राबवावे. समाजातील उणिवेवर मात करण्यासाठी आणि महिलांच्या समस्या सोडविण्याबाबत अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन पाटील यांनी केले.

तसेच ते पुढे म्हणाले कि, महिला व बालविकासाच्या क्षेत्रात विविध व्यक्ती आणि संस्थांना येणाऱ्या अडचणी त्यांनी कळविल्यास त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येईल. समाजात महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे देखील त्यांनी आश्वासित केले.

या कार्यक्रमास महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त आर.विमला, उपायुक्त राहुल मोरे, उपायुक्त दिलीप हिवराळे, विभागीय उपायुक्त संजय माने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कांबळे आदी उपस्थित होते.