आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं – चंद्रकांत पाटील

पुणे : भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बापट हे मागील दीड वर्षांपासून पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा, सून, नात  असा परिवार आहे. बापट यांच्यावर आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बापट यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोरकं झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले कि,  भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबतच आम्हा भाजपाच्या परिवारावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.

गिरीश बापट हे गेल्या दीड वर्षांपासून आजाराशी लढत होते. तरीदेखील त्यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत एका मेळाव्यादरम्यान हजेरी लावली. त्यांचं आपल्या पक्षाशी असणार एकनिष्ठतेच नातं यावेळी दिसून आलं. समाजकार्य आणि विकासाचं राजकारण त्यांनी केलं. पुणेकरांकडून त्यांना भरभरून प्रेम मिळालं. पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार , मंत्री, खासदार असा हा त्यांचा पदापर्यंतचा प्रवास.