नव्या शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

18

कोल्हापूर : कोल्हापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा २८ व्या पदविका प्रदान समारंभात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन गुणवंत पदवीधरांना पदवी प्रदान करुन त्यांचा गौरव केला. देशाची प्रगती होण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून नव्या शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर देण्यात येत असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्नातकांना पदविका प्रमाणपत्र देण्यात आले. राज्यभरातील नामांकित तंत्रनिकेतन महाविद्यालयांपैकी एक कोल्हापूरचे तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे, ही अभिमानाची बाब आहे अशा शब्दांत गौरव करुन चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात तरुणांचे प्रमाण अधिक असल्यामुळे भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशातील तरुण आणि त्यांच्या अंगी असलेली बुद्धिमत्ता, प्रमाणिकपणा व नम्रता ही देशाची ताकद आहे. या गुणवत्तेच्या जोरावरच जगातील बहुतांशी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर भारतीय वंशाच्या तरुणांचे प्रमाण अधिक आहे.

येत्या काळात हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढेल असा विश्वास व्यक्त करुन चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या व्यवसायाभिमुख आणि प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. पदविकाधारक विद्यार्थ्यांनी एवढ्यावरच शिक्षण न थांबवता पदवी व डॉक्टरेट मिळवण्यासाठीही प्रयत्न करावेत. कौशल्य शिक्षण व व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी विविध क्षेत्रात संधी असून यासाठी विद्यार्थ्यांनी त्या त्या क्षेत्राला आवश्यक असणारे ज्ञान, माहिती घ्यावी, असे पाटील म्हणाले.
या कार्यक्रमाला उद्योजक रवी डोली, सहसंचालक डॉ.डी.व्ही. जाधव, प्रभारी प्राचार्य डी.एम.गर्जे, परीक्षा नियंत्रक पी.पी.खेडकर, नियामक मंडळाचे सदस्य तथा उद्योजक राजेश पिरळकर, विजय पत्की, संजीव शिवपूरकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.