पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज कचरा संकलन वाहनांचे लोकार्पण

5

पुणे : आज पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ग्राउंड येथे ८० घनकचरा संकलन गाड्यांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक गतीने होण्यासाठी या गाड्यांचा वापर होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. ही वाहने शहर स्वच्छता आणि पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांनी शहरातील कचरा संकलनाविषयी यावेळी माहिती घेतली. ओला आणि सुका कचरा वेगळा संकलीत करून सर्व कचऱ्यावर प्रक्रीया होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी या नव्या वाहनांचा उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शहरात दैनंदिन सुमारे २ हजार १०० मे.टन घनकचरा निर्माण होतो. निर्माण झालेला कचरा महापालिकेमार्फत संकलीत करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते. त्यासाठी ही नवी वाहने भाडेतत्वावर घेण्यात आली आहेत. या सर्व वाहनांवर जीपीएस आणि आरएफआयडी उपकरणे बसविण्यात आली असून वाहनांच्या कामांची नोंद महानगरपालिकेतील नियंत्रण कक्षाद्वारे घेण्यात येणार आहे. या वाहनांवर ७ वर्षासाठी सुमारे ३२५ कोटी खर्च होणार आहे.
महापालिकेतर्फे ओला व सुका कचरा संकलनासाठी स्वतंत्र वाहनांचा उपयोग करण्यात येत असून १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रीया करण्यात येत आहे. कचरा संकलन प्रक्रीयेसाठी १०८ लहान वाहने, ९३ ओला कचरा संकलक वाहने आणि सुक्या कचऱ्यासाठी ५६ कॉम्पॅक्टर अशी एकूण २५७ वाहने भाडेतत्वावर घेण्यात येत आहे. त्यापैकी ८० वाहनांचे लोकार्पण करण्यात आले असून उर्वरीत महिन्याभरात महापालिकेच्या सेवेत दाखल होतील.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त आशा राऊत, महेश डोईफोडे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, कार्यकारी अभियंता गणेश उगले, कनिष्ठ अभियंता आशिष कोळगे आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.