उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गंधर्व वेद प्रकाशन आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

1

पुणे : वारकरी आणि कीर्तन संप्रदायाशी संबंधित शेखबाबा महंमद यांच्या अभंगांचं अंतरंग सांगणारे समन्वयी संत शेख महंमद यांची अमृत अभंगवाणी आणि एकनाथ महाराजांच्या हरिपाठाचे सार्थ स्वरुपात मांडणी असलेले एकनाथ महाराज यांच्या सार्थ हरिपाठाचे‌ प्रकाशन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रकाशक खाडिलकर यांनी कौतुक केले. त्यांनी जवळपास १३२ पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. काही वेड असणारी माणसं असतात, वेड असल्याशिवाय काही निर्मांण देखील होत नाही, असे पाटील यांनी म्हटले. या दोन पुस्तकांचे प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होत असल्याचे पाटील म्हणाले. या दोन्ही पुस्तकांचे लेखक उत्तम संत साहित्य अभ्यासक आहेत तसेच सेवानिवृत्त प्राचार्य आहेत. या दोन्ही संतांनी महाराष्ट्राची भावसमृद्धी वाढवली, दैवी गुणांची जोपासना केली आणि जगायचे कसे याची शिकवण या संतांनी दिली.
एकनाथ महाराजांचा देखील हरिपाठ प्रसिद्ध आहे. त्याची सार्थ आवृत्ती गेली अनेक वर्ष मराठीत उपलब्ध नव्हती. ते ऐतिहासिक महत्वाचे कार्य डॉ. मुकुंद दातार यांनी केले आहे, त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. समन्वयी संत शेख महंमद यांनी पुराण आणि कुराण या दोन्हींचा अभ्यास केला होता. ते सुफी संत होते पण भागवत धर्माचे अभ्यासक होते. त्यांच्या अभंगाचा उत्तम परिचय प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केला आहे.
आम्हाला माणसाला पैसे कमवण्याच्या बरोबरीने पैसे खर्च करण्यात आनंद मानणार शिक्षण द्यायचं आहे असे यावेळी पाटील म्हणाले. कमवण्याचं इंग्रजांनी शिकवलं. खर्च करण्यात आनंद मानण्याचं तत्वज्ञान हे हिंदू तत्वज्ञान आहे. ते मांडण्याचा प्रयन्त आगामी काळात होत असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी संगितले.

यावेळी गंधर्व वेद प्रकाशनचे प्रकाशक दीपक खाडिलकर, प्रसिद्ध किर्तनकार चारुदत्त आफळे, लेखक डॉ. मुकुंद दातार, प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अभय टिळक, डॉ. सदानंद मोरे यांच्यासह संतसाहित्याचे अभ्यासक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.