पुण्यातील जुन्या पुरातन वाड्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार सकारात्मक आहे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

13

पुणे : आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाड्यांच्या स्थानिकांची भेट घेऊन पाहाणी केली. या जुन्या वाड्यांचे पुनर्निर्माण करण्यास अनेक अडथळे आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करुन मार्ग काढू, असे चंद्रकांत पाटील यांनी आश्वस्त केले.

चंद्रकांत पाटील म्हणले कि, पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकामांना आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सदर परिसरातील अनेक बांधकामे धोकादायक परिस्थितीत आहेत. पुरातत्व विभागाच्या परिपत्रकामुळे पुण्याचा मध्यभाग असलेल्या शनिवार वाड्याच्या शंभर मीटर परिसरात नव्याने बांधकाम किंवा दुरुस्ती करता येत नाही. शहरातील अन्य ठिकाणीदेखील अशी समस्या येत आहे.

याबाबत राज्य शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे पाटील म्हणाले. मात्र याबाबतचे पुरातत्व विभागाशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित असल्याने त्याबाबतची माहिती घेऊन बांधकामांना स्थगिती नसल्यास पुरातत्व विभागाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, त्यासाठी स्थानिकांना सोबत घेऊन दिल्लीत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.