पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिरूर तालुक्यातील विकासकामांचा घेतला आढावा

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरुर पंचायत समिती येथे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पाटील यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. एमआयडीसी परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, नगरपंचायतीअंतर्गत दशक्रिया घाटाभोवती असलेली अतिक्रमणे काढण्यात यावी, पाणी पुरवठा विभागाने दुषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, उन्हाळ्यातील पाणी टंचाई लक्षात घेता पाणी काटकसरीने वापरण्याबाबत नियोजन करावे, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे देण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी केल्या.
महसूल विभागाअंतर्गत गौण खनिज उत्खनन, पाणंद रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत जिल्हा नियोजनमधून झालेली प्राप्त निधी; त्याअंतर्गत सुरु असलेली कामे, नगर परिषद कार्यालयांनी शहरात सुरु असलेली कामे, कृषि विभागाअंतर्गत कांदा अनुदान, अवकाळी पाऊस त्याअनुषंगाने देण्यात येणाऱ्या मदतीबाबत कार्यवाही, महाडीबीटीवरील योजना, शिक्षण विभागाअंतर्गत शाळा दुरुस्ती, नवीन खोल्या, संरक्षक भिंत, शौचालय, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य विभागाअंतर्गत कोविड-१९ अनुषंगाने सक्रिय रुग्ण, बरे झालेले रुग्ण, लसीकरण, औषध पुरवठाबाबत बैठकीचे आढावा घेण्यात आला.
यावेळी आमदार अशोक पवार, विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू, जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, गट विकास अधिकारी अजित देसाई, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर आदी उपस्थित होते.