आपला आणि समाजाचा विकास घडवावा, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना ठरेल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील मागील दोन दिवसापासून पुणे दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांनी त्यांच्या कोथरूड मतदारसंघाला भेट दिली. अखिल कोथरुड भिमजयंती महोत्सव २०२३ च्या वतीने आयोजित जयंती उत्सवात चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भीमवंदना त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना केली. यावेळी आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी पाटील म्हणाले कि, लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशातील वंचित घटकाच्या उन्नतीसाठी अनेक लोकोपयोगी योजना राबवित आहे. स्टार्ट अप आणि स्टॅंड अप ही त्यापैकीच एक आहे. त्यामुळे अशा योजनांचा समाज बांधवांनी लाभ घेऊन, आपला आणि समाजाचा विकास घडवावा, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमानंतर बोपोडी येथील राजर्षी शाहू महाराज चौकात भेट दिली. येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पाटील म्हणाले कि, सत्ता परिवर्तन झाल्यापासून राज्यात सर्व सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे होत आहेत. उपस्थित सर्व अनुयायांना संबोधित करुन शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशातील जनभावनेला प्राधान्य देऊन मुंबईतील इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्मारक उभे करण्यासाठी सर्व प्रकराच्या परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच हे स्मारक उभे राहणार असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील पाटील यांनी यावेळी केले.