वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उस्थितीत आढावा बैठक संपन्न

4

पुणे : पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उस्थितीत आढावा बैठक पार पडली. या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या तातडीने सोडवण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला यावेळी दिल्या. वैकुंठ स्मशानभूमीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे वापर होत असलेले लाकडावरील शवदहन कमी करावे. त्याचप्रमाणे लाकडावरील शवदहनाऐवजी विद्युत व गॅस दाहिनी उभारावी आणि त्यावेळेस होणारा धूर कमी करण्यासाठी एक ड्राय स्क्रबर उभारण्याच्या सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, विकास ढाकणे, शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, विद्युत विभागाचे श्रीनिवास कंदुल, प्रदूषण नियंत्रणचे प्रताप जगताप, विक्रांत लाटकर यांच्या सह महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील लोकांची समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबर एक समिती गठीत करून तेथील व्यवस्थापनाबाबत अहवाल तयार करण्याबाबत सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

डॉ. खेमणार यांनी माहिती दिली, पुणे महानगरपालिका क्षेत्रात १० विद्युत दाहिन्या, १३ गॅस दाहिन्या, १ हायब्रीड दाहिनी तसेच २३ ए.पी.सी. यंत्रणा असे एकूण ४७ यंत्रणा शवदहनासाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी विकेंद्रित स्वरुपात या सुविधांचा वापर केल्यास वैकुंठ प्रमाणे एकाच ठिकाणी जास्त ताण येणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. त्यादृष्टीने पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.