पुण्यामध्ये लवकरच वृक्षांसाठी पहिली ऍम्ब्युलन्स देणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीच्या वतीने पहिला समर्पण पुरस्कार प्रसिध्द अभिनेते श्री सयाजी शिंदे यांना जाहीर झाला होता. आज एका हृद्य कार्यक्रमात हा पुरस्कार सयाजी शिंदे यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेजी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती होती. पुण्यामध्ये लवकरच वृक्षांसाठी पहिली ऍम्ब्युलन्स येणार असल्याची घोषणा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले कि, गुवाहाटीमध्ये एक ऍम्ब्युलन्स डेव्हलप केली आहे जी वृक्षांची डॉक्टर आहे. ती ऍम्ब्युलन्स गावोगाव फिरते आणि  झाडाला खिळे मारलेले आहेत ते काढते, फ्लेक्स लावलेले आहेत ते काढते. पोस्टर चिटकवले असतील तर  ते काढते. एखाद झाड मरायला लागलं असेल तर ते वाचवण्याचा प्रयत्न  करतात. अशी हि ऍम्ब्युलन्स गावोगाव फिरते. यातूनच कल्पना सुचली. त्यामुळे आज मी येथे घोषित करू करू इच्छितो कि पुणे जिल्ह्यातील पहिली ट्री ऍम्ब्युलन्स म्हणजेच झाडांसाठीची ऍम्ब्युलन्स आम्ही देणार.

जिल्हा नियोजनच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच सह्याद्री देवराई संस्थेच्या कार्यास सर्वतोपरी मदत करण्याचे यावेळी आश्वास्त केले. दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी पुणे येथे पहिल्या वृक्ष संवर्धन ऍम्ब्युलन्सची लवकरच सुरवात करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी म्हटले.

या पुरस्कार प्रदान सोहळ्याला मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, राजेश पांडे, ॲड मंदारभाऊ जोशी, ॲड अर्चिता मंदार जोशी, बाळासाहेब जानराव, समीर पाटील, मिलिंद कुलकर्णी, सुनील महाजन यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.