पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हिंजवडी गावातील सुविधांचा आढावा

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हिंजवडी गावातील कस्तुरी चौक, वाकड उड्डाणपूलाजवळील वाढते वायरचे जाळे तसेच लावण्यात आलेले जाहिरात फलक याबाबत शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेण्यात आली. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना चंद्रकांत पाटील यांनी सूचना दिल्या.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि , या भागातील अनधिकृत जाहिरात फलक काढण्यात यावेत. आवश्यकता भासल्यास फलक काढताना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी. सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करुन एमआयडीसीने संपूर्ण खर्च करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबाबत कंत्राटदाराकडून दिरंगाई होत असल्यास संबंधितांना नोटीस बजवावी. एमआयडीसी हिंजवडी मध्ये बांधण्यात आलेला नवीन उड्डाणपूल वाहतूकीस लवकरात लवकर सुरु होईल याचे नियोजन करावे. खाजगी एजन्सीच्या माध्यमातून कचऱ्याचे व्यवस्थापन करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी कचऱ्याची समस्या, वाकड चौकातील वाहतुकीची समस्या, सर्कल- नांदेड रोड, माण रोड, आदीबाबतही आढावा घेण्यात आला.
 यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहूल महिवाल, हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल सी.एस. भोगल, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजय देशमुख उपस्थित होते.