संभाव्य पाणीकपातीने येणाऱ्या अडचणींबाबत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

7

पुणे : जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय विश्रामगृह येथे पार पडल्या. यावेळी यंदाच्या पावसाच्या अंदाज पाहता धरणातील पाणीबचत करणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी म्हटले. तथापि, पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढील दिवस पाणीपुरवठा विस्कळित होण्याबाबतच्या समस्येच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आठ दिवसात उपाययोजना सादर कराव्यात. तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरू करण्यात येणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदा हवामान विभागाकडील अंदाज पाहता थोडी टंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. तसेच शासनपातळीवरुन विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. चाऱ्याचे नियोजन आत्ताच सुरू केले असून जवळच्या राज्यातून चारा आणण्याविषयी तयारी सुरू आहे. धरणात आहे ते पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे.

पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. तथापि, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो असे लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. त्यावर महापालिकेने अभ्यास करुन आठ दिवसात तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करावे. तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही. शेतीसाठीही पुरेसा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

खडकवासला प्रकल्पातील ४ धरणात मिळून २५ एप्रिलपर्यंत ११.६१ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यानुसार नियोजन करुन नवीन मुठा उजव्या कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे ठरले. पुणे महानगरपालिकेसाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.
आजच्या या बैठकीत जुना मुठा उजवा कालव्याचे अस्तरीकरण, खडकवासला प्रकल्प ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा उजवा कालव्यासाठी बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण आदी अनुषंगाने देखील चर्चा करण्यात आली.
यावेळी खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस खासदार वंदना चव्हाण, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, राहूल कुल, भिमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.