‘मन की बात’ राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग
नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विशेष कार्यक्रमाचे ९९ भाग पूर्ण झाले असून, येत्या रविवारी ३० एप्रिल रोजी याचा १०० वा भाग प्रसारित होणार आहे. याचे औचित्य साधून आजपासून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन विज्ञान भवनात करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर, विभागाचे सचिव अपूर्व चंद्र व्यासपीठावर उपस्थित होते. या परिषदेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आतापर्यंत प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात प्रधानमंत्री यांनी ७०० पेक्षा अधिक वेळा लोकांशी संवाद साधला आहे. या ३०० संघटनाचा उल्लेख केला असून यामधले ३७ व्यक्ती आणि १० परदेशी संस्था आहेत. आजपासून सुरु असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये चार सत्रे असणार आहेत.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर या राष्ट्रीय परिषदेस विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित आहेत. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान, रवीना टंडन, चंद्रकांत दामोदर कुलकर्णी, बंडू सीताराम धोत्रे, सोनाली हेलवी, राजेंद्र यादव, डॉक्टर रोहीदास बोरसे, चंद्रकिशोर पाटील आणि शर्मिला ओसवाल, वेदांगी कुलकर्णी, शैलेश भोसले, डॉ. अन्यया अवस्थी या काही लोकांचा समावेश आहे.
या राष्ट्रीय परिषदेत, देशाच्या विविध भागातील १०० सन्माननीय नागरिक सहभागी झाले आहेत. या सर्वांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ च्या विविध भागांमध्ये उल्लेख केला आहे. या व्यक्तींनी देश उभारणीत दिलेल्या विशेष योगदानाची दखल प्रधानमंत्री यांनी आपल्या मासिक संवाद कार्यक्रमातून वेळोवेळी घेतली आहे.
पुण्याचे चंद्रकांत कुलकर्णी यांनी, आपल्या १६,००० रुपयांच्या मासिक निवृत्तीवेतनातून दरमहा ५,००० रुपये, स्वच्छता मोहिमेसाठी देण्याचा संकल्प केला आहे. चंद्रपुरचे बंडू सीताराम धोत्रे, ‘पर्यावरण संरक्षण संघटना’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष असून, त्यांच्या संस्थेने, चंद्रपूरचा किल्ला आणि आसपास स्वच्छता मोहीम राबवली. साताऱ्याची सोनाली हेळवी ही महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील महिला कबड्डी संघाची कर्णधार आहे. राजेंद्र यादव हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांच्या ट्रॅक्टरचा वापर करुन लसीकरणासाठी उपयुक्त वाहन तयार केले. पुण्याचे डॉ. बोरसे हे कोविड योद्धा आहेत.
चंद्रकिशोर पाटील यांच्या नाशिकमध्ये गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठीच्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता. अलिबागजवळील केनाड येथील रहिवासी असलेल्या शर्मिला ओस्वाल गेल्या २० वर्षांपासून अनोख्या पद्धतीने भरड धान्यांचे उत्पादन करत असून त्यांना ‘मिलेट्स वुमन’ म्हणून त्यांची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
उद्घाटनपर सत्रात उपराष्ट्रपतींच्या हस्ते दोन पुस्तकांचे अनावरण करण्यात आले. त्यापैकी पहिले पुस्तक “मन की बात @१००” हे कॉफीटेबल पुस्तक आहे यामध्ये या कार्यक्रमाची आतापर्यंतची वाटचाल तसेच या कार्यक्रमामुळे प्रधानमंत्री आणि सामान्य नागरिक यांच्या दरम्यानच्या थेट संवादाला उत्तेजन देण्याचे परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित करण्यात आले आहेत.
दुसरे पुस्तक प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.वेम्पती यांनी लिहिलेले “कलेक्टिव्ह स्पिरीट, काँक्रीट ॲक्शन.” मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांच्या हृदयात असलेल्या ज्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरणविषयक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक तसेच तंदुरुस्तीविषयक समस्यांसह विविध संकल्पनांवर चर्चा केली त्यांची माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहेत.