जिल्ह्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करुन नागरिकांना उत्तम प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, कायाकल्प व आशा स्वयंसेवीका यांचा, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आरोग्य केंद्र आणि शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करुन नागरिकांना उत्तम प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेने जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे सेवा देऊन संकटातून बाहेर काढले, असे गौरवोद्गार काढून चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोना संकटात सेवा बजावताना जिल्ह्यातील ३८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्या बलिदानाची दखल घेत त्यांचे जिल्हा परिषदेत येथे स्मारक उभारण्याचे काम सुरु असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.
निष्ठापूर्वक करीत असलेल्या कार्याची दखल बक्षिसाच्या स्वरूपात घेतली जाते असे सांगत पाटील यांनी पुरस्कार प्राप्त आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील राहू, अशीही ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, महाराष्ट्र राज्याची कठीण प्रसंगात त्यागाची, बलिदानाची परंपरा असून कोरोनाच्या महामारीच्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राज्याच्या संस्कृतीला शोभेल असे काम आरोग्य विभागाने केले आहे. कोरोनाच्या काळात बलिदान दिलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आशा स्वयंसेविका आदींना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, शरद बुट्टे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!