पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यात येईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे ग्रामीण पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या पोलीस वाहनांच्या हस्तांतरण कार्यक्रमात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून तसेच कंपन्यांचे सामाजिक दायित्व निधीतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदल आणि पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी अधिकाधिक खर्च केला पाहिजे, असे विचार व्यक्त करुन पाटील म्हणाले, गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी पोलीस विभाग अद्ययावत करण्यासाठी डीपीडीसीतून भरीव निधी देण्यात येईल. त्यातून केवळ वाहनेच नव्हे तर अत्याधुनिक साधनसामुग्री, सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर, सीसीटीव्ही यंत्रणा आदींवर भर देण्यात यावा. पोलीसांची निवासस्थाने, कार्यालयांचे अद्ययावतीकरण यासाठीदेखील निधी देऊ. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण आदींसाठी पोलीस दलानेही पोलीस कल्याण निधी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असेही पाटील म्हणाले.