शाहू महाराजांचे सगळे विचार आपण आपल्या आचरणात आणले पाहिजेत असा संकल्प करूया – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : समाजातील सर्वच घटकांसाठी लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचे कार्य महत्वपूर्ण आहे. त्यामुळे शाहू महाराजांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्या विचार व कार्याला उजाळा देण्यासाठी कोल्हापुरात 6 ते 14 मे 2023 या कालावधीत कृतज्ञता पर्व-2023 आयोजन करण्यात आले आहे. या कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आज सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून मानवंदना देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, आपल्या सगळ्यांवर, समाजावर शाहू महाराजांचे प्रचंड उपकार आहेत. समाजातील विविध वाईट चालीरीतींवर त्यांनी आघात केला. जातीयता संपवण्यासाठी त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली. विधवा पुनर्विवाहासाठी स्वतः आग्रह धरला. त्यांच्या या कार्यामुळेच गेल्या वर्षी राज्य शासनाने असा निर्णय घेतला कि, आपण पूर्ण वर्ष स्मृती शताब्दी वर्ष करायचं , त्याची आज सांगता आहे . त्यानिमित्ताने १००सेकंद स्तब्ध उभं राहू जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. शाहू महाजांनी जे जे आग्रह धरले गरीब मराठा आरक्षण, मुलींचे शिक्षण , सक्तीचे शिक्षण ,असे सगळे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजेत, असा संकल्प आपण करूया असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

शाहू स्मृती स्थळ येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,  माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनी पुष्पहार अर्पण करुन शाहू महाराजांना अभिवादन केले. याठिकाणी आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिक यांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले. याठिकाणी शाहूंप्रेमींनी दिलेल्या “श्री शाहू महाराज की जय ..!” या जयघोषाने समाधी स्थळ परिसर दुमदुमून गेला.

सकाळी ठिक 10 वाजता रस्त्यांवरील एस.टी. बसेससह चौकाचौकातील सिग्नलवरील अन्य वाहने, जागेवर थांबली होती. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, बँकांमधील ग्राहक, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिकांनी उपक्रमात सहभागी होऊन लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली.