पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुभवल्या पुण्याचे स्व. खासदार गिरीश बापट यांच्या व्यापक जनसंपर्काच्या वेगळ्या पाऊलखुणा
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले आणि पुणे जिल्ह्यातील भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्याला आधार देणारा, दांडगा जनसंपर्क असलेला व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जण असणारा मोठा नेता अनेक कार्यकर्त्यांना पोरक करून गेला. पण आज देखील त्यांच्या कार्याची अनुभूती देणारा प्रसंग पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना अनुभवायला मिळाला आहे. त्याबाबत फेसबुक पोस्टद्वारे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.मुळशी येथील एका गावाच्या पुलाच्या नामकरण कार्यक्रमास ते उपस्थित होते.
आपल्या पोस्ट मध्ये ” पुण्याचे खासदार गिरीशभाऊ बापट यांच्या व्यापक जनसंपर्काच्या वेगळ्या पाऊलखुणा आज अनुभवायला मिळाल्या. मुळशी तालुक्यातील सिद्धेश्वर हे मुठा नदीवर वसलेलं छोटंसं गाव. या गावात जायला एकच छोटा पूल होता. पण तोही अतिशय जीर्ण झाल्याने नवीन पुलाची आवश्यकता होती. पावसाळ्याच्या दिवसात इथल्या नागरिकांना जीव धोक्यात घालून पुल ओलांडून पुण्याकडे यावं लागत होतं. त्यामुळे गिरीश बापट यांनी आपल्या अधिकारातून हा पूल उभारुन इथल्या ग्रामस्थांना मोठा आधार दिला. त्यांच्या याच कार्याप्रती कृतज्ञता म्हणून गावकऱ्यांनी या नवीन पुलाचे नामकरण गिरीश बापट यांच्याच नावाने केले आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सेवेसाठी जन्म आपुला म्हणून जनसेवेसाठी समर्पित होऊन काम करत असतो. बापट साहेबांच्या रुपाने हे दाखवून दिले आहे” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.