शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्याच्यादृष्टीने राज्याच्या महत्त्वाकांक्षी अशा सौरकृषि वाहिनी योजनेला गती द्यावी – चंद्रकांत पाटील
पुणे : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंदकांत पाटील यांच्या हस्ते २०२३-२४ साठी कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण केले. तसेच राज्यस्तरीय खरीप हंगाम २०२२ च्या पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.आत्मा यंत्रणेमार्फत तयार करण्यात आलेल्या विविध घडीपत्रिकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे; तसेच बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी अशा प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्याच्यादृष्टीने राज्याच्या महत्त्वाकांक्षी अशा सौरकृषि वाहिनी योजनेला गती द्यावी. या योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले, त्याचबरोबर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवडीचा उपक्रम चांगला असून त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धीद्वारे शेतकऱ्यांना महत्व पटवून द्यावे, अशा सूचना यावेळी पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे , आमदार भिमराव तापकीर, आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषि सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी अनिल देशमुख आदी उपस्थित होते.