आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श छत्रपती संभाजी महाराज यांनी समोर ठेवला, चंद्रकांत पाटील
पुणे : आज किल्ले पुरंदर येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय सोहळा दिमाख्यात पार पडला. या सोहळ्यास पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी पाटील यांनी पुढील वर्षी राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन उपस्थित शंभू भक्तांना दिले.
कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले “परकीय आक्रमाणाच्यावेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श संभाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांचे बलिदान आजही देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे. छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते, तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे. अशा महापुरुषांची जयंती साजरी करतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जाणून घेणे आवश्यक आहे.
यावेळी आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, गटविकास अधिकारी अमर माने, पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.