चंद्रकांत पाटील यांच्या थेट भेट उपक्रमात कोथरुडकरांच्या अनेक समस्यांचे निराकरण, नागरिकांकडून समाधान व्यक्त

पुणे : पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या थेट भेट उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकताच
थेट भेट’ या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्पा कोथरुडमधील थोरात गार्डन येथे पार पडला. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्या चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडल्या व या समस्यांवर आश्वासन व तारीख न देता पाटील यांनी थेट जागेवर निर्णय देऊन नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले.

यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांसाठी बालनाट्याच्या कार्यक्रमाचे आयोजन, उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर उद्यानातील डायनासोर पुन्हा कार्यान्वित करणे, स्वच्छता गृहातील दिवे यांसह टवाळखोर तरुणांवर चाप बसवणे आदी समस्या मांडल्या गेल्या. कोल्हापूरच्या धर्तीवर कोथरुड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या टेरेसवर तारांगण उभारावे, अशी अपेक्षा काही नागरिकांनी व्यक्त केली.

त्यावर चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्व समस्यांचे निवारण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या टेरेसवर तारांगण साकारण्यासाठी आयुक्तांशी चर्चा करुन त्याची अंमलबजावणी करु, अशी ग्वाही हि दिली. पाटील यांच्या या थेट निराकरणामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.