चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय बायोटेक पुरस्कार 2023 आणि राष्ट्रीय बायोटेक युवा पुरस्कार 2023 चे वितरण
कराड : कृष्णा विश्व विद्यापीठ संलग्न कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ अलाइड सायन्सेस आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचा काल समारोप झाला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी चंद्रकांत पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय बायोटेक पुरस्कार 2023 आणि राष्ट्रीय बायोटेक युवा पुरस्कार 2023 चे वितरण करण्यात आले.
कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित या परिषदेत देशाच्या विविध राज्यातून सुमारे 400 विद्यार्थी – संशोधक उपस्थित होते. कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ अलाइड सायन्सेसच्या सर्व टीमने केलेल्या नेटक्या संयोजनामुळे ही राष्ट्रीय परिषद यशस्वी ठरली. चंद्रकांत पाटील यांनी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, बायोटेक्नॉलॉजीचा वाढता विस्तार, संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार करत असलेले प्रयत्न आदींवर यावेळी आपली भूमिका मांडली.