पुण्यातील टिंबर मार्केट भीषण आग प्रकरणी पंचनामे तातडीने पूर्ण करुन, अहवाल सादर करण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या पोलिस अधिकाऱ्यांना सूचना

पुणे : पुण्यातील भवानी पेठ परिसरातील टिंबर मार्केटमध्ये काल भीषण आग लागून, प्रचंड नुकसान झाले. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज टिंबर मार्केट येथे जाऊन घटनास्थळाची पाहाणी केली. या घटनेत काही दुकानांसोबतच काही घरांचेही नुकसान झाले आहे. पाटील यांनी व्यापारी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यासोबतच नुकसनाग्रस्त झालेली तीन घरे लोकसहभागातून उभी करुन देऊ असे आश्वस्त हि केले.

पोलीस प्रशासनाने पंचनामे तातडीने पूर्ण करुन, अहवाल सादर करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. याशिवाय भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर ही व्यापाऱ्यांशी चर्चा केली.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी स्नेहा देवकाते-किसवे, तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के, पुणे मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोटे, पुणे टिंबर मर्चन्ट ॲड सॉ. मिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रतन किराड, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी नगरसेविका मनीषा लडकत यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.