४ एकर परिसर आणि तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी, पुणे विद्यापीठात साकारणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे नृत्य संकुल – चंद्रकांत पाटील

पुणे : नृत्य गुरु मनिषा साठे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मनेषा नृत्यालय कार्यक्रम तथा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्र्कांत पाटील यांनी उपस्थित राहून नृत्य गुरु मनिषा साठे यांचे अभिष्टचिंतन केले.

नृत्यकलेचे संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे नृत्य संकुल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुमारे ४ एकर परिसरात उभारणार असून, त्यासाठी राज्याचा उच्च शिक्षण विभाग, पुणे विद्यापीठ आणि जिल्हा नियोजन मधून मिळून तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली. हा निधी ४ टप्य्यांमध्ये वितरित करण्यात असल्याचे सांगत जिल्हा नियोजन मधून तात्काळ १० कोटी रुपये तसेच राज्याचा उच्च शिक्षण विभागाकडून १५ कोटी रुपये देण्यास मान्यता देण्यात आल्याचं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. २५ कोटी रुपयांच्या कामाचा पहिला टप्पा पुढील दीड ते दोनवर्षाच्या कालावधीत पूर्ण होईल असा विश्वास देखील पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, नृत्य गुरु शमा भाटे, सुचेता चापेकर, प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सह कला क्षेत्रातील विविध मान्यवर यांच्यासह शास्त्रीय नृत्यप्रेमी उपस्थित होते.