पुणे शहरातील नाट्यगृहांचा कायापालट होणार, चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर

पुणे: पुणे शहरातील बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण, गणेश कला क्रीडा, पंडित भीमसेन जोशी कलामंदिर, अण्णाभाऊ साठे आदी नाट्यगृहांची आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सविस्तरपणे माहिती घेतली. मागील काही काळापासून कलाकार आणि प्रेक्षक यांच्याकडून यासंदर्भात अनेक तक्रारी येत होत्या याच पार्श्वभमीवर पाटील यांनी संबंधित प्रशासकिय अधिकाऱ्यांची आज बैठक घेतली.

या बैठकीत शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी जून महिनाअखेरपर्यंत नागरिक तसेच नाट्यकलावंतांकडून सूचना मागवण्यात याव्या आणि १५ जुलैपर्यंत दुरुस्तीची कामे सुरू करून ऑगस्ट महिनाअखेरपूर्वी ती पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

तसेच बालगंधर्व रंगमंदिराच्या मूळ वास्तूचे नूतनीकरण करण्यात यावे. रंगमंदिराच्या स्वच्छतेसाठी अनुभवी संस्थेची नेमणूक करून नीटपणे स्वच्छता राखली जाईल याची दक्षता घ्यावी. रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी नागरिकांकडून सूचना मागवाव्या आणि जून महिनाअखेरपर्यंत सर्व कामांच्या निविदा काढण्यास सुरुवात करावी आणि दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात यावी. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या लक्षात घेता नाट्यगृह दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्याबाबत एक महिनापूर्वी पूर्वसूचना देण्यात यावी, अशीही सूचना यावेळी पाटील यांनी केली.

या बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त चेतना केरुरे आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.