पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी मोफत खिचडी – प्रसाद वाटप उपक्रमाचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे : श्री शंकर महाराज संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येत असतात. आज पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकरिता एक स्तुत्य उपक्रम या संस्थेमार्फत सुरू करण्यात आला.
पुणे विद्यापीठात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनच नव्हे, तर राज्यभरातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. अनेक विद्यार्थी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे अतिशय खडतर परिश्रम घेऊन ज्ञानार्जन करतात. यापैकी काहीजणांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करताना मोठी कसरत करावी लागते. अशा गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महाराजांच्या मठातील खिचडी हा प्रसाद उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाटील यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.