प्रभाग क्रमांक १३ मधील नागरी समस्या तातडीने सोडवा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

14

पुणे : कोथरुड मधील प्रभाग क्रमांक १३ मधील नागरी समस्या तातडीने सोडवा, अशी सूचना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केली. तसेच, आवश्यकता असेल तिथे आमदार निधी देखील वापरावा‌‌, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सूचित केले.तसेच, दर महिन्याला प्रत्येक भागांतील नागरी समस्यांसंदर्भात बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचेही यावेळी नमुद केले.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज प्रभाग क्रमांक १३ मधील नागरी समस्यांसंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, परिमंडळ २ चे उपायुक्त संतोष वारुळे, परिमंडळ ३ च्या उपायुक्त आशा राऊत, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय अधिकारी राजेश गुर्रम, मलनिस्सारण अधिक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, भाजपा शहर सरचिटणीस पुनीत जोशी, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे यांच्या सह स्वप्नशिल्प, तारा रेसिडेन्सी यांसह १६ सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांनी भागातील समस्या नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या समोर मांडल्या. यात प्रामुख्याने महापालिका क्षेत्रीय कार्यालयाच्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, अंतर्गत जलवाहिनी, मलनिस्सारण वाहिन्या, अनाधिकृत कचरा डेपो, स्वप्नशिल्प आणि तारा रेसिडेन्सी भागातील अतिक्रमणे, नाल्यांवरील सिमांत भिंती, नाल्यावरील अनाधिकृत खाटिकखाने आदी समस्यांचा समावेश होता.

सदर समस्यांची तातडीने दखल घेऊन नामदार पाटील यांनी आज महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन सदर समस्या तातडीने सोडवा अशी सूचना केली. तसेच, स्वप्नशिल्प तारा रेसिडेन्सी भागातील महापालिकेच्या वाहनांसाठी भागातील अतिक्रमणे हटवून तिथे वाहने पार्क करावीत.

तसेच, स्वप्नशिल्प सोसायटी लगतच्या नाल्याच्या सिमा भिंती महापालिकेने बांधाव्यात, अन्यथा लोकसहभागातून उभारू‌ असा इशारा दिला. तसेच, सोसायटीतील अंतर्गत जलवाहिनी आणि मलनिस्सारण वाहिन्या मुख्य वाहिन्यांना जोडण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागाने मदत करावी. नाल्यावरील अनाधिकृत खाटिकखाने तातडीने बंद करावेत. भुजबळ बाग येथील अनाधिकृत कचरा डेपो हटवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी सूचना केली.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत १४ वर्षे मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षण सेवकांच्या प्रश्नावर महापालिकेच्या उदासिनतेवर नामदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयातून पाठपुरावा करुन त्यासाठी सर्व उपाययोजना केल्यातरी महापालिकेचे अधिकारी याची गांभीर्याने दखल घेऊन शिक्षण सेवकांना न्याय देत नाही, हे धोरण अतिशय चुकीचे असल्याची भूमिका ही नामदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.