पुणे : पुणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन ॲन्ड अपार्टमेंट फेडरेशन लि. आणि पुणे मनपा यांच्या विद्यमाने गृहप्रकल्पांचा पुनर्विकास विषयावर चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई यांच्या सह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, २०१४ ते १९ या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना शासनाची एकही इमारत यापुढे रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा निर्मिती करणारी नसेल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्यास त्यांना अर्थसंकल्पात निधी मिळणार नाही असा निर्णय घेण्यात आला. पुणे महानगर पालिकेनेही यापुढे नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना मान्यता ती ग्रीन अपार्टमेंट, सोसायटी नसेल तर परवानगी मिळणार नाही असा निर्णय घेतला आहे. गुणवत्तापूर्ण शहर निर्मितीच्यादृष्टीने याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अगोदर झालेल्या सोसायट्यातही त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक निधी शासकीय तसेच लोकसहभागातून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
कोथरूडच्या ५०० सोसायट्यांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग व ते नष्ट करणाऱ्या मशीन बसवण्यासाठी प्रयत्न असून आतापर्यंत १० सोसायट्यात ते बसवले आहेत. सोसायटीनिहाय अशा बारीक सारीक बाबींचा विचार झाला पाहिजे. असे उपक्रम शासकीय, जिल्हा वार्षिक योजना अथवा नगरविकासच्या योजनेत बसवता येईल का यासाठी प्रयत्न सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा बागा, गाडी धुण्यासाठी उपयोग असे करण्याचा विचार करावा, असे आवाहन पाटील यांनी केले.
सौर पॅनेल, उत्तम जिमनॅशियम, इनडोअर खेळांचे कोर्ट, सुक्या व ओल्या कचऱ्याची निर्गती होते, सांडपाण्याचे पुनर्प्रक्रिया होऊन वापर होतो अशी एक सोसायटी महासंघाने निवडावी. या सोसायटीला लागणाऱ्या सर्व बाबी सोसायटीचा निधी तसेच अन्य निधी मिळवून पूर्ण करू असे, असे त्यांनी सांगितले.
पुणे शहरात १७ हजार सोसायट्या व पूर्ण महाराष्ट्रात १ लाख गृहनिर्माण संस्था व १ लाख अपार्टमेंट असल्याने त्यांना कोणतेही अभियान दिल्यास वेगाने ते राबविले जाऊ शकते, असेही पाटील म्हणाले.
प्रारंभी उपसभापती डॉ. गोऱ्हे आणि मंत्री श्री. पाटील यांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली. या प्रदर्शनात गृहनिर्माण संस्थांना उपयुक्त विविध सेवा पुरवठादार, उपयुक्त साधने, संरक्षण उपकरणे, बँका आदींचे स्टॉल समाविष्ट आहेत.