उजनी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन व पिण्याचे पाण्याचे माहे फेब्रुवारी २०२४ पर्यंतचे नियोजन – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

39
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासंदर्भात उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची दूरदृश्यप्रणालीद्वारे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात दिनांक 2 नोव्हेंबर 2023 अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणीसाठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने पाणी सोडण्याचा यावेळी निर्णय झाला.
जलसंपदा विभागाने रब्बी हंगाम 2023-24 व पिण्याच्या पाण्यासाठी उजनी प्रकल्पातून दिनांक 4 नोव्हेंबर 2023 पासून पाणी सोडणेबाबत नियोजन केले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे पाणी सोडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील वीज खंडित करावी जेणेकरून शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी पोहोचेल, अशा सूचना ही यावेळी पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच सदर पाणी आवर्तन सोडण्याचे नियोजन माहे फेब्रुवारी 2024 अखेर पर्यंतचे आहे. त्यामुळे पुढील पाणी नियोजन कशा पद्धतीने करावयाचे याबाबत जानेवारी अखेरपर्यंत कालवा समितीची पुन्हा बैठकीच्या नियोजनाची सूचना केली.
यावेळी आमदार सर्वश्री बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, समाधान आवताडे, सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते तर जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी, कार्यकारी संचालक कोल्हे, उजनी धरण व्यवस्थापन प्रकल्पाचे मोरे, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता बागडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.