चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेनुसार कोथरूड मतदारसंघांमध्ये मुला- मुलींसाठी भव्य सांघिक किल्ला स्पर्धेचे आयोजन
पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेनुसार कोथरूड मतदारसंघांमध्ये सालाबादप्रमाणे मुला- मुलींसाठी भव्य सांघिक किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
‘भव्य सांघिक किल्ले बनवा’ या स्पर्धेचे चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पाच गट करण्यात आले आहेत. पहिला गट हा १२ वर्षांखालील मुलांसाठी, दुसरा गट १२ वर्षांखालील मुलींसाठी, तिसरा गट १८ वर्षांखालील मुलांसाठी, चौथा गट हा १८ वर्षांखालील मुलींसाठी आणि पाचवा गट हा १८ वर्षांपुढील खुला गट असणार आहे. यामध्ये विविध गटांनुसार बक्षिसे तसेच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहेत.
प्रत्येक वयोगटातील मुले – मुली मिळून सर्वोत्तम अशी ३ बक्षिसे देण्यात येणार आहे. गट क्रमांक १ आणि २ यांना प्रथम क्रमांकाचे ८००१ रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांकाला ६००१ रुपये आणि तृतीय क्रमांकाला ५००१ रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. गट क्रमांक ३ आणि ४ यांना अनुक्रमे ११००१ रुपये, ८००१ रुपये आणि ६००१ रुपये असे बक्षीस देण्यात येणार आहे. या सोबतच खुला गट क्रमांक ५ ला अनुक्रमे १२००१ रुपये, ९००१ रुपये आणि ७००१ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. सोबतच सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देखील देण्यात येणार आहे. तसेच एकूण ५० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या प्रवेशिका नामदार चंद्रकांत दादा पाटील जनसंपर्क कार्यालय कर्वे पुतळा चौक ,कोथरूड तसेच बाणेर येथे युनियन बँक शेजारी दिनांक 3 नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध असतील. प्रवेशिका भरून देण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर असेल. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांना माती रांगोळी तसेच चार मावळे (चित्रे )हे गरजेनुसार देण्यात येतील तरी आपण सर्वांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.