कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

35
मुंबई : कार्तिकी एकादशी यात्रा २०२३ उत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सिंहगड निवासस्थान येथून दृकश्राव्य माध्यमातून सोलापूर जिल्हा प्रशासनासोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा २०२३ दि १४ ते २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये होत आहे. या यात्रेसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्र राज्यासह अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. यानुषंगाने या भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समिती व सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे सदर बैठकीत पाटील यांनी नमूद केले.
चंद्रकांत पाटील यांनी पोलीस विभागाने सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोरपणे नियोजन करावे, यात्रेसाठी संबंधित विभागांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशाही सूचना सदर बैठकीत केल्या.

शहरात कोठेही अस्वच्छता राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. यात्रेनिमित्त निर्माण करण्यात आलेल्या 5 नियंत्रण कक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष तयार करावे. दर्शन रांग लांब जात असल्याने दर्शन रांगेत ठिकठिकाणी भाविकांना विसावा घेण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व त्या ठिकाणी त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण कराव्यात. तसेच स्कायवाकच्या ठिकाणीही भाविकांसाठी बैठक व्यवस्था करावी, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.

 

23 नोव्हेंबर 2023 रोजी शुद्ध कार्तिकी एकादशी असल्याने या दिवशी शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते. सर्व संबंधित विभागाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी परस्परात समन्वय ठेऊन चोखपणे पार पाडावी, अशी करून दि. 16 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्यावतीने भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी पंढरपूर येथे येऊन करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

यात्रा कालावधीत पंढरपूर येथे जनावरांचा मेळावा भरत असतो, परंतु मागील एक दोन वर्षात लंपी आजारामुळे जनावरांचे मेळावे किंवा बाजार भरले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर  जनावरांचा मेळावा घेण्याचे नियोजन असेल तर लंपीग्रस्त जनावरे या मेळाव्यास येणार नाहीत याबाबत पशुसंवर्धन विभागाने दक्षता घ्यावी, अशी सूचना पाटील यांनी केली. तसेच जिल्हाधिकारी यांनी पुढील एक-दोन दिवसात जिल्हास्तरावर या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाची बैठक घेऊन पंढरपूर येथे मेळावा घेऊ शकतो का याची खात्री करावी असेही त्यांनी सूचित केले.

दृकश्राव्य माध्यमातून संपन्न झालेल्या या बैठकीस सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, प्रांत अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर गजानन गुरव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, पंढरपूर तहसीलदार सुशील बेल्हेकर, पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.