मुंबई : महाराष्ट्र राज्यात कला शिक्षणाचा विस्तार व्हावा यास्तव यंदाच्या हिवाळी अधिवेशनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम २०२३ या विधेयकाचा प्रस्ताव मांडला होता. यानुषंगाने राज्यातील पदविका कलाशिक्षण देणाऱ्या शेकडो संस्थांमधील प्रवेश, अभ्यासक्रम आणि त्यासोबतच त्यांना मान्यता देणे तसेच स्वायत्तता प्रदान करणे आदींचे नियोजन करण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम २०२३ हे विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी सदस्यांसह विरोधकांनीही एकमताने या विधेयकास मंजुरी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या विधेयकामुळे कला शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून यामुळे गावपातळीवरील संस्था आणि पदविका अभ्यासक्रम यांनाही बळकटी मिळेल असा विश्वास वाटत असल्याचे पाटील म्हणाले.