ज्याप्रमाणे कुंभ मेळ्यात साधू, संतांची, सज्जनांची मांदियाळी बघायला मिळते अगदी तशीच पुस्तक प्रेमींची मांदियाळी पुण्यात बघायला मिळत आहे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

3
पुणे, २१ डिसेंबर : पुणे सारख्या विद्येचे माहेरघर आणि वाचनप्रेमींचे शहर म्हणून ओळख असलेल्या शहरात राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत सरकाचे शिक्षण मंत्रालय, राज्य शासन, पुणे महापालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आपल्याकडे पुस्तक किंवा ग्रंथ यांना गुरू मानले जाते. शिवाय, वाचाल तर वाचाल असा कानमंत्रही थोरामोठ्यांकडून दिला जातो. पण, आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे तरुण पिढी वाचन संस्कृतीपासून दुरावते आहे अशी खंत अनेकांकडून व्यक्त केली जाते. पण वस्तुतः ‘वाचन-संस्कृती’ निर्माण होण्यासाठी तिचे संवर्धन आणि जतन होण्यासाठी काही पूरक घडामोडी समाजात सतत घडाव्या लागतात. त्यातील काही या संस्थात्मक पातळीवरच्या असतात आणि काही नैमित्तिक असतात. पण त्यांची जितकी जास्त उपलब्धता असेल, त्यातून जेवढे आदान-प्रदान होईल, तितकी ‘वाचन-संस्कृती’ची वाट सुकर होत असते.
ज्याप्रमाणे कुंभ मेळ्यात साधू, संतांची, सज्जनांची मांदियाळी बघायला मिळते अगदी तशीच पुस्तक प्रेमींची मांदियाळी पुण्यात बघायला मिळत आहे. या वाचनप्रेमींच्या समुहाचा मी देखील एक घटक असल्याने आज या पुस्तक महोत्सवास भेट दिली. यावेळी अनेक दिग्गज लेखकांची पुस्तक खरेदी केली असल्याचे पाटील यांनी म्हटले.
पाटील यांनी सांगितले कि, या महोत्सवात तीन पुस्तकांनी माझे विशेष लक्ष आकर्षित केले. एक म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची मूळ प्रत, याशिवाय डॉ . गिरीश दाबके यांचे ‘नरेंद्रपर्व’ आणि डॉ . सचित्तानंद शेवडे आणि परिक्षित शेवडे यांचे ‘राम मंदिरच का?’ . यापैकी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीचे दर्शन होणे माझ्यासाठी भाग्याचे होते. याशिवाय इतर दोन पुस्तकांच्या खरेदीचाही मोह मला आवरला नाही. याप्रसंगी एका शाळकरी मुलाने पुस्तक खरेदीबाबतची जिज्ञासा आणि औत्सुक्य पाहून अतिशय कौतुक वाटले.
यामध्ये शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देऊन उत्सुकतेने पुस्तकांची खरेदी करीत आहेत. ही आजच्या पिढीसाठी चांगली बाब आहे. येथे पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री झालेली असून २४ डिसेंबरपर्यंत आणखीन पुस्तकांची विक्रमी विक्री होईल, अशा शब्दात या भव्य आयोजनाबद्दल पाटील यांनी कौतुक केले.
या पुस्तक महोत्सवामुळे चार विश्वविक्रम मोडण्यात आले आहे हे पुस्तक महोत्सवाचे वैशिष्ट आहे. दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये पुस्तक प्रकाशन, पुस्तकावर चर्चा, पुस्तक वाचनाविषयी मार्गदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यमहोत्सव असे भरगच्च कार्यक्रम होत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.