स्वर्गीय मुक्ता टिळक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने ‘नानावाडा’ येथे स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण
पुणे : आज स्वर्गीय मुक्ता टिळक यांची प्रथम पुण्यतिथी. इतिहासाच्या पाऊलखुणा जपताना क्रांतिकारकांचे स्मरण रहावे यासाठी स्वर्गीय मुक्ताताई टिळक यांनी आपल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच पुणे महापालिकेच्या माध्यमातून ‘नानावाडा’ येथे स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय सुरु करण्यात आले आहे. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने या संग्रहालयाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आपल्या पुण्याला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला आहे. इतिहास कालीन अनेक घटना; म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते अनेक थोर क्रांतिकारांनी पुण्याला आपली कर्मभूमी बनवली. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील अनेक गडकोट किल्ले, पेशवेकालीन शनिवार वाडा, लाल महाल, नाना वाडा, केसरी वाडा, फुले वाडा, भिडे वाडा अशी एक ना अनेक ऐतिहासिक वास्तू या शहरात उभ्या असून, आजच्या पिढीला आपल्या समृद्ध इतिहासाची राजरोसपणे आठवण करून देत आहेत. इतिहासाच्या या पाऊलखुणा जपताना क्रांतिकारकांचे स्मरण रहावे यासाठी स्वर्गीय मुक्ताताई टिळक यांनी आपल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा केला होता.
या संग्रहालयात बाळ गंगाधर टिळक, लहुजी राघोजी साळवे आणि उमाजी नाईक खोमाणे यांसारख्यांच्या व्यक्तींचा गोष्टींच्या नोंदी जतन करण्यात आल्या आहेत. ऐतिहासिक पुण्याच्या पाऊलखुणा जपण्यासाठी मुक्ताताईंनी सुरू केलेल्या पाठपुराव्यातील अशा नोंदी लक्षात आणून देऊन, त्याचेही जतन आणि संवर्धन करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा नेते सुनील देवधर, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक, लोकमान्य मल्टिपर्पजचे किरण ठाकूर, अभिनेते क्षितीज दाते, भाजपा नेते शैलेश टिळक, कुणाल टिळक यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.