५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न… प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

44
पुणे :राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल,असा विश्वास यावेळी राज्यपाल बैस यांनी व्यक्त केला.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की, मुंबई येथे १९७९ आणि २००६ मध्ये पुण्याला  हे प्रदर्शन भरविण्याची  संधी मिळाली होती. अलीकडच्या काळात आर्थिक प्रगतीसाठी नाविन्यता आणि नवकल्पनांना महत्व प्राप्त झाल्याने अशा प्रदर्शनाचे महत्व वाढले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणातही विद्यार्थ्यांची शोधकवृत्ती वाढीस लागेल यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रदर्शनातील वैज्ञानिक आविष्कार  अत्यंत उपयुक्त आहेत, असे त्यांनी सांगितले. एक ट्रस्ट तयार करून अशा प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. संपूर्ण देशातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, विविध भागधारक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती या प्रदर्शनास भेट देणार आहेत. प्रदर्शनाकरीता ३१ राज्यातील  विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला आहे. या व्यतिरिक्त नवीन शैक्षणिक विचार प्रवाह, यशोगाथा व यशस्वी उपक्रम यासाठी राज्यातून निवडक २५ दालनाद्वारे विविध शासकीय व स्वयंसेवी संस्था यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. हे प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे.

प्रदर्शनाचा मुख्य विषय  ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ असा निश्चित केला आहे. सामाजिक,पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून  माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि नवोपक्रम,पर्यावरणीय चिंता,  वर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास आणि आमच्यासाठी गणित असे सात उपविषय निर्धारित करण्यात आले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.